महावितरण विभागाकडून मागणी कामांची पाहणी व पूर्ण करण्याचे आश्वासन, दैनिक समर्थ भारतच्या वृत्ताचा परिणाम.
समर्थ भारत वृत्तसेवा
कवठे येमाई, ता.२५: महावितरण विभागाकडून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून ती कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. यामध्ये मुख्यतः पुरातन फत्तेश्वर मंदिराच्या आवारात असणाऱ्या ३३/२२ के.व्ही. ट्रांसफार्मरची जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन शिरुरचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांनी प्रत्यक्ष जागेला भेट दिली व तो ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याचे आश्वासित केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव उघडे व भरत भोर हे उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी कार्यकारी अभियंता महावितरण केडगाव यांना कवठे पांजरपोळ नवीन रोहित्र बसविणे,कवठे गणेश नगर माळीमळा नवीन रोहित्र बसवणे, कवठे फत्तेश्वर मंदिर रोहित्र स्थलांतर करणे, कवठे डांगे चौक लाईन स्थलांतरित करणे, कवठे काळे आळी गावठाण तारा ओढणे या कामांबद्दल पत्र दिले होते. यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांडभोर, बाळासाहेब डांगे, दिनेश काळे, दत्तात्रय घोडे यांनी पाठपुरावा केला होता. तसेच कवठेचे सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी, सर्व सदस्यांकडूनही फत्तेश्वर मंदिराजवळील ट्रांसफार्मर बदलण्यासंबंधी महावितरणशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.
दैनिक समर्थ भारत मध्ये रविवार दि.१९ रोजी रोहित्रची जागा बदलणे बाबतचे वृत्त दिले होते, त्याची दखल घेऊन महावितरण आणि संबंधितांनी कार्यवाही केली. त्याबद्दल दैनिक समर्थ भारतचे आभार. (सुनीता पोकळे, सरपंच)