समर्थ भारत वृत्तसेवा
बेल्हे, ता. २६: कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर रविवारी (दि. २६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेल्हे गावच्या हद्दीत टेम्पो आणि पीकअपची समोरासमोर जोदार धडक बसून दोघांचा मृत्यू झाला असुन नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली.
कल्याण विशाखापट्टनम महामार्गावरील बेल्हे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने येत असलेली एम.एच.४३ बी.पी.३१०८ या पिकअप गाडीला जी.जे.०६ बि.टी.८९११ या मालवाहू टेंम्पो गाडीची जोरात धडक बसल्याने पिकअप गाडी मधील रिपुसुदन पांडे (वय ५४) व चंद्रकला पांडे(वय ४६ ) हे दोघे जण मुत्यूमुखी पडले तर चांदणी रिपुसुदन पांडे, पौर्णिमा मुरलीधर पांडे, अनिता मधुसुदन पांडे, पल्लवी रीपुसुदन पांडे, अर्पणा मुरलीधर पांडे, वसंत जितेंद्र रायसिंगभाई, मुरलीधर मधुसुदन पांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण घणसोली मुंबई येथील रहिवासी असुन ते एकाच कुटुंबातील असुन शनि शिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून भिमाशंकर या ठिकाणी चालले होते.
जखमी झालेल्या सर्वांना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी अपघात झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी आळेफाटा पोलीस घटना स्थळी पोहोचल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पिंगट यांनी नाराजी व्यक्त केली असून सर्व जखमींना आळेफाटा येथे रुग्णवाहिकेत बसवून देण्यासाठी संजय पिंगट, प्रदिप पिंगट व इतर स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले. समोरासमोर धडक झाल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बेल्हे गावाच्या हद्दीतून कल्याण विशाखापट्टनम , बेल्हे शिरुर तसेच बेल्हेजेजुरी हे महामार्ग गेले आहेत. बेल्हे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. शिरुर, पारनेर ,आंबेगाव या तालुक्यांच्या हद्दी जवळच असल्याने वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असल्याने लहानमोठे अपघात, चोरीच्या घटना, लहानमोठ्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालल्याने बेल्हे गावात पोलीस ठाणे होणे गरजेचे आहे. (प्रदिप पिंगट, सामाजिक कार्यकर्ते)
रुग्णवाहिका चालक
बेलकर यांचे सहकार्य
यावेळी रुग्णवाहिका चालक नवनाथ बेलकर यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून सहकार्य केले. तसेच शासकीय १०८ नंबरची रुग्णवाहिका व राजुरी येथील अकबर पठाण यांचीही रुग्णवाहिका अगदी वेळेत उपलब्ध झाल्याबद्दल प्रदीप पिंगट आणि ग्रामस्थांनी त्यांचेही आभार मानले.