समर्थ भारत वृत्तसेवा
बेल्हे, ता. २७: शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील चौत्रा वस्ती येथील गट नंबर ५९९ मधील गोरख पंढरीनाथ हांडे यांच्या शेतात असलेल्या कापणी करुन ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली असून शेतक-याने कष्टाने पिकवलेल्या व वर्षभर आपल्या कुटूंबाच्या बेगमीसाठी असलेल्या धान्याचं नुकसान झाले असून अशा नीच प्रवृत्तीच्या माणसांचा शोध घेऊन शिक्षा झाली पाहिजे अशी भावना शेजारील शेतक-यांनी व्यक्त केली.
आग लागल्याचे दिसताच शेजारी असणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण गंजीने पेट घेतला होता व त्यामध्ये संपूर्ण गव्हाची व गहू झाकून ठेवलेल्या प्लास्टिकच्या कागदाची राखरांगोळी झाली होती. सदर अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदेवाडीच्या पोलीस पाटील उषा शिंदे व ग्रामस्थांनी केली. तलाठी व ग्रामसेवक यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर शेतक-याचे अंदाजे ८०,००० रुपयांचे नुकनास झाले असून तसा अहवाल तहसिल कार्यालयास पाठविल्याचे आणे-शिंदेवाडीचे तलाठी संजय गारकर यांनी सांगितले.