नैसर्गिक संकटांमुळे शेत नापीक झाले, कर्ज फेडण्यासाठी सावकाराचा तगादा; कुटुंबाच्या पोशिंद्याने आयुष्यच संपवलं.
समर्थ भारत वृत्तसेवा:
सततची नापिकी, शेतावर येणारे अनेक
संकट यातून मार्ग काढताना पैसा उरला नाही. यामध्येच खासगी सावकारासह बँकांचे कर्ज
हप्ते कसे फेडणार, या विवंचनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील रांजणी येथील ४२ वर्षीय शेतकरी
अशोक सुखदेव औंधकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे शेत सततच्या नैसर्गिक
संकटांमुळे नापीक झाले होते.
खासगी
सावकाराचं कर्ज, बँकेकडून घेतलेले उसने पैसे असा दुहेरी कर्जाचा डोंगर त्यांच्या
डोक्यावर होता. बँक आणि सावकाराने कर्ज फेडण्यासाठी सततचा तगादा लावल्याने अशोक
औंधकर यांनी स्वत:चे जीवन संपविणे या मार्गाचा अवलंब केला. आणि त्यांनी गळफास घेऊन
आत्महत्या केली.
औंधकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली दोन भाऊ आई-वडील
आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. कुटुंबप्रमुख असणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन
आत्महत्या केल्यानंतर पुढे कुटुंबाचं काय होणार? मुलींचे लग्न मुलाचं लग्न शिक्षण या गोष्टीकडे
कोण बघणार? हे प्रश्न औंधकर कुटुंबासमोर आ वासून उभे राहिले आहेत. अशोक
औंधकर यांचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक
मृत्यूची नोंददेखील झाली आहे.
मागील काही काळापासून कुठेतरी शेतकरी आत्महत्या सत्र हे थांबलेलं पाहायला मिळालं होते. मात्र आता पुन्हा एकदा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायला मिळत आहेत. याची अनेक कारणे आहेत. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. शासन आणि प्रशासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी निघालेल्या कर्ज योजना याच शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याचं पाहायला मिळत आहे.