समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, ता. २५: खैरेनगर ता. शिरुर येथील रस्त्यावर अज्ञात
वाहनाची दुचाकीला धडक बसून मनोज पांडुरंग मोरे या युवकाचा जागीच मृत्यू होऊन अक्षय
मोहन बोराडे हा गंभीर जखमी झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन
चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
खैरेनगर ता. शिरुर येथून अक्षय बोराडे व त्याचा मित्र मनोज मोरे हे दोघे २४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच २३ बि एफ ०१७७ या दुचाकीहून कान्हूर मेसाई हून पाबळ बाजूकडे चाललेले असताना कान्हूर मेसाई बाजूने आलेल्या अज्ञात कारची दोघांच्या दुचाकीला जोरदार धडक बसून दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने दोघा जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. या अपघातात मनोज पांडुरंग मोरे वय २३ वर्षे रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर हा मयत झाला तर अक्षय मोहन बोराडे वय २२ वर्षे रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर हा गंभीर जखमी झाला असून याबाबत सुहास विष्णू शेटे वय २५ वर्षे रा. चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कसबापेठ ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने; शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी करत आहे.