समर्थ भारत वृत्तसेवा:
नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दाभड हद्दीतील बाबा पेट्रोल
पंपाजवळ कार आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन
जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री नांदेड ते अर्धापूर मार्गे जाणाऱ्या भरधाव
कारने दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली.
भरधाव कार क्र. एम.एच ३७ जी ९८८९ ने दुभाजकावरुन दुसऱ्या बाजूने
समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.१३ सी.यु.४६४४ ला जोरदार धडक दिली. मागून येणारी
कार आय ट्वेंटी होती. या गाडीतील अमित विठ्ठल घुगे वय २९ रा. तरोडा आणि आयशरमधील
रामा प्रल्हाद डोंगरे (वय ५० वर्ष) रा. इंचगाव ता. मोहोळ जि.सोलापूर यांचं जागीच
निधन झालं. या भीषण अपघाताची माहिती मिळताच जखमींना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात
दाखल करण्यात आलं.
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण सतत वाढतं आहे. अतिवेगामुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर झाला आहे. समोरुन येणारा आयशर ट्रक आणि कारची धडक इतकी भीषण होती की या अपघातात संपूर्ण कारचा चुराडा झाला आहे. तसंच या कारमधील तिघं गंभीर जखमी असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.