समर्थ भारत वृत्तसेवा:
कोथरुड भागातील तरुणाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची
धक्कादायक घटना खेड शिवापूर भागात घडली. अभिषेक यशवंत टिळक (वय.२० वर्ष) असे या
तरुणाचे नाव आहे.
अभिषेक हा दोन महिन्यांपूर्वी भास्कर जगताप यांच्याकडे गाडीचा चालक
म्हणून कामाला लागला होता. नेहमीप्रमाणे टेम्पो घेऊन गाडीमध्ये नारळ वृक्षांच्या
फांद्या औंधवरून खेड शिवापूरला निघाला होता. यावेळी खेड शिवापूरला भास्कर जगताप
यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये गट क्रमांक ११ मध्ये असलेल्या शेतामध्ये नारळाच्या
फांद्या खाली करण्यासाठी टेम्पो अभिषेकने इलेक्ट्रिक पोलच्या तारेखाली उभा केला.
अभिषेक टेम्पोत चढला असताना नारळाची फांदी २२ केव्ही वीजप्रवाह असलेल्या तारेला
लागली आणि त्याला विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही माहिती कळताच
नागरिकांनी धाव घेतली. अभिषेक हा आई वडिलांना एकटाच मुलगा होता. त्याच्या पश्चात
एक बहीण आहे. या घटनेने अभिषेक याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.