समर्थ भारत वृत्तसेवा
बेल्हे, ता. ३०: येथील बांगरवाडी गावाच्या सीमेवरुन वाहणारा पिंपळगाव जोगा कालवा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरला असून शेतक-यांचे बागायतदार होण्याचे स्वप्न साकार होताना दिसून येत आहे. परंतु हे होत असताना या महिन्यात विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेतक-यांनी आपल्या मोटारी उचलपाण्यासाठी कालव्यावर ठेवल्या ख-या पण त्या मोटारीवर चोरट्यांची नजर गेली व रविवारी(दि.२९) रात्री ७.५ अश्वशक्तिच्या व अंदाजे दोन लाख रुपयांच्या ६ मोटारी केबल व स्टार्टरसह अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची माहिती बेल्हे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले यांनी दिली.
सोमवारी (दि.३०) सकाळी दिवसा वीजपुरवठा असल्याने गफले आपली मोटार चालू करण्यासाठी कालव्यावर गेले असता त्यांची मोटारचे पाईप कापून मोटार नेल्याचे दिसून आले व अधिक तपास केला असता बांगरवाडीचे माजी सरपंच पांडूरंग शिरतर, गोविंद बिचारे, नामदेव बांगर, संजय बांगर यांच्याही मोटारींची चोरी झाल्याचे दिसून आले. यापूर्वीही असे प्रकार झाले असून त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
संजय बांगर यांची
मोटार दुस-यांदा चोरीला गेल्याने सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून पुन्हा
नवीन मोटार आणण्याचा खर्च परवडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कालव्यावर
याअगोदरही जवळपास ९ शेतक-यांच्या मोटारी चोरीस गेल्याचे समजले आहे. अगोदरच
शेतमालाला बाजारभाव नाही,बेल्हे येथील एक सोयाबीन व्यापारी शेतक-यांचे लाखो रुपये बुडवून
पळून गेला असून त्यात आता मोटारींची चोरी झाली असून अशा परिस्थितीत शेतक-यांनी
जगावं कि मरावं असा प्रश्न माजी सरपंच पांडूरंग शिरतर यांनी विचारला.