समर्थ भारत वृत्तसेवा
बेल्हे, ता. १८: कै. हौसाबाई गंगाराम शेळके यांच्या स्मरणार्थ एस एम बी टी हॉस्पिटल, घोटी (नाशिक), बुधरानी हॉस्पिटल पुणे, समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बेल्हे (बांगरवाडी) व राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी मोफत महाआरोग्य शिबिर, सर्वरोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे राजुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एस एम बी टी हॉस्पिटल घोटी (नाशिक) येथून १५ डॉक्टरांची तर बुधरानी हॉस्पिटल पुणे येथून ६ डॉक्टरांची टीम उपस्थित झालेली होती. या शिबिराचा राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील रुग्णांनी व पंचक्रोशीतील जवळपास २२२९ रुग्णांनी लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये सहभागी रुग्णांना आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना इत्यादी मध्ये समाविष्ट सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी पुढे पाठवण्यात आले आहे.
बुधरानी हॉस्पिटल पुणे मार्फत १३५३ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २११ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर २०० रुग्णांना डोळ्यांचे औषध देण्यात आले. डोळ्यांचा मोतीबिंदू, काचबिंदू, लासुर्वे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळा पडद्यावर वेल याप्रकारच्या विविध शस्रक्रिया करण्यात येणार असून त्यातील पहिल्या ३८ लोकांची बॅच शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आली.
एस एम बी टी हॉस्पिटल च्या वतीने हृदयरोग, कॅन्सर निदान व उपचार, स्त्रियांचे आजार, पोटाचे आजार व शस्त्रक्रिया, बालरोग विभाग, तोंडाचे व दातांचे आजार, त्वचेचे आजार, अस्थिरोग, संधिवात, मेंदू, किडनी, कान, नाक, घसा संबंधित आजार, मुळव्याध, भगंदर, फिशर, मधुमेह, लघवी व रक्त शर्करा तपासणी तसेच सर्व रोगनिदान उपचार व तपासणी या सर्व आजारासंबंधीच्या चाचण्या व शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण ८७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी एस एम बी टी हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहे. हाडांचे आजार असलेल्या १९ रुग्णांना, जनरल शस्त्रक्रियेसाठी १७ रुग्णांना, स्त्रियांचे आजारासंबंधी ८ रुग्णांना, त्वचेचे विकारासंबंधी १३ रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटल घोटी येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती वल्लभ शेळके यांनी दिली.