नाशिक प्रतिनिधी:
जन्म दाखला
देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक महानगरपालिकेच्या वरिष्ठ महिला
लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. प्रेमलता
प्रेमचंद कदम असे अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचारीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेमलता या
नाशिक महानगरपालिकेत जन्ममृत्यू कार्यालयात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार यांना त्यांच्या नातीचा जन्मदाखला हवा होता. यासाठी ते महानगरपालिकेत गेले असता
जन्मदाखल्यासाठी प्रेमलता यांनी पाचशे रुपये लाचेची मागणी करण्यात आली. त्यानंतर
तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार
सापळा रचून एसीबीच्या पथकाने पाचशे रुपये लाच घेताना प्रमेलता यांना रंगेहाथ अटक
केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा
त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची
मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन
अँन्टी करप्शन ब्युरोकडून करण्यात आले आहे.