सातारा प्रतिनिधी:
सातारा
तालुक्यातील वाढे येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच
खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. मृतदेहाबद्दल
माहिती घेण्याचे काम सुरू होते. भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंद
असलेल्या बंगल्याच्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाढे येथे माजी आमदार कांताताई नलावडे यांचे निवासस्थान आहे. बंगल्याच्या
परिसराची साफसफाई करत असताना शुक्रवारी दुपारच्या सुमारास अर्धवट पुरलेल्या
स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी
नागरिकांनीही गर्दी केली होती.
सातारा तालुका
ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह
कोणाचा आहे, याबाबत रात्री उशिरापर्यंत
माहिती घेण्याचे काम सुरू होते. पोलिस अधिक तपास घेत आहेत.