पुणे प्रतिनिधी:
पुणे मंडईतील रामेश्वर चौक परिसरात पुर्ववैमनस्यातून तरुणावर
गोळीबार करुन कोयत्याने वार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे
शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात
आले. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ
याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे
तपासात उघडकीस आले आहे.
रूपेश राजेंद्र जाधव (वय.२४ वर्ष) रा. कुंभारवाडा, नाना पेठ, प्रथमेश गोपाळ येमूल (वय.२२ वर्ष) रा. नाना पेठ, बाळकृष्ण विष्णु
गाजुल (वय.२४ वर्ष) रा. नाना पेठ अशी
अटक केलेल्यांची नावे आहेत.तर शेखर अशोक शिंदे (वय.३२ वर्ष) हा जखमी झाला असून त्याची प्रकृती
चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बाळकृष्ण गाजुल हा मुख्य संशयित आरोपी आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने
जाणाऱ्या शेखर यास अडवून टोळक्याने त्याच्यावर पिस्तुलातुन गोळ्या झाडल्या, तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. दरम्यान, भरवस्तीत गोळीबार व खुनाच्या प्रयत्नाची
घटना घडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
पसार
झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट एककडून शोध घेण्यात येत होता. आरोपी
रुपेश आणि साथीदार प्रथमेश कोंढवा भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना
अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार बाळकृष्ण याला मार्केट यार्ड परिसरात सापळा
लावून पकडण्यात आले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले.
काही महिन्यांपुर्वी झालेल्या अक्षय वल्लाळ
याच्या खून झाला होता. किशोर शिंदे व त्याच्या साथीदारांनी हा खुन केल्याचा संशय
वल्हाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल यास होता. त्यातुनच गाजुल याने कट रचून
किशोरचा भाऊ शेखर याच्यावर जीवघेणा हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात
उघडकीस आले आहे.