सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे – निलीमकुमार खैरे || पुणे जिल्ह्यातील युवकांनी उभारली वन्य जीव सामाजिक संस्था
समर्थ भारत वृत्तसेवा
प्रतिनिधी (प्रमोल कुसेकर), ता. १८: सर्पमित्र हे सापांपासून मानवाच्या रक्षणासह सापांच्या रक्षणाचे आदर्श काम करत असतात मात्र सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांच्या पुढाकाराने नुकतीच वन्य जीवांच्या रक्षणासाठी निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली, त्या संस्थेच्या अनावरण प्रसंगी सर्पमित्रांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे बोलत होते, यावेळी निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक अलताब सय्यद, राहुल तिकूटे, दिपक बनसोडे, साईदास कुसाळ, रमेश हरिहर, अभिजित वाघमारे, गणेश माटे, नरेश बावीसकर, नितीन शेरकर, अमोल कुसाळकर, विजय पडघन, शुभम मोरे, हेमंत परदेशी, सतीश भवाळ, साक्षी कांबळे यांसह आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग वन्य जीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले तर सचिव अमर गोडांबे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी बोलताना वन्य जीवांच्या बाबतचा कायदा कडक झालेला असून सर्वांनी कायद्याचे पालन करावे, वेळोवेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ सर्पमित्रांचे मार्गदर्शन घ्यावे, वन्य जीवांचे रक्षण करत असताना त्या वन्य पशु पक्षांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेत प्रत्येकाने स्वतःची सुद्धा विशेष काळजी घ्यावी असे आवाहन देखील ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले.