अहमदनगर प्रतिनिधी: शिर्डी जवळील सावळीविहीर येथे साईबाबा पालखीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूण जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान , पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार , विकी भांगे (वय.३० वर्ष) रा. पुसद , यवतमाळ असे गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव असून निलेश सुधाकर पवार (वय.२७ वर्ष) गोरेगाव मुंबई असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. मुंबईतील गोरेगाव येथून साईबाबांची पालखी शिर्डीकडे निघाली होती. याच पालखीत विकी भांगे आणि सुधाकर पवार सहभागी झाले होते. पालखी शिर्डीत पोहोचल्यावर पवार याच्यावर गोळीबार करण्यात आला. जखमी निलेशने गोळीबार करणाऱ्या तरूणाच्या बहिणीसोबत दोन वर्षांपूर्वी पळून जावून लग्न केले होते. त्याचाच राग मनात धरून गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
समर्थ भारत माध्यम समूह