मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव
तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयांना पुणे
जिल्हा परिषदेच्या सदस्य तुलसी सचिन भोर यांच्या पुढाकारातून बारा लाख रुपये
किमतीचे २७३ डस्टबिन देण्यात आले. त्यामुळे शाळांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न
मार्गी लागण्यास मदत होणार आहे, असे आंबेगाव तालुका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील यांनी सांगितले.
चास, ता.आंबेगाव येथे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हिंगे पाटील बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन भोर, पोलीस निरीक्षक जीवन माने, शरद बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे, किसनराव सैद, भीमाशंकरचे संचालक अंकित जाधव, दादाभाऊ पोखरकर, बाबासाहेब खालकर
यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
तुलसी भोर म्हणाल्या “गावात व शाळेत कचरा होऊ नये म्हणून जागरूक नागरिक शाळांमधून घडावेत, अशी अपेक्षा आहे. तसेच कृतियुक्ता शिक्षण ही काळाची गरज असून
स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी शाळांना डस्टबिन देण्यात आले आहेत.’’
महात्मा गांधी, संत गाडगेबाबा या
समाज सुधारकांनी अनेकदा स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. माणसाने स्वच्छतेची
सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आजच्या काळात स्वच्छता ही काळाची गरज
बनली आहे, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.
व्यसनापासून विद्यार्थी, युवक व शिक्षकांनी दूर राहिले पाहिजे, अशी अपेक्षा देवदत्त निकम यांनी व्यक्त केली. स्वच्छ व सुंदर शाळा योजना राबवा. चांगल्या शाळांचा गौरव करा, अशी मागणी बाळासाहेब कानडे (गुरुजी) यांनी केली. प्रास्ताविक ए. एफ. इनामदार यांनी केले. के. के. सैद यांनी स्वागत केले. विनोद बोंबले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सुनील वळसे पाटील, साहेबराव शिंदे, एन. के. भालेराव, मनोहर सांगळे, ए. बी. फुंदे यांनी केले.