मंचर ता २१ : मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी मंचर येथील गौरव शिवाजी राजगुरू या २९ वर्षीय युवकाला दोघांनी लथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण करत गौरवचा खून केला होता. यासंदर्भात गौरवचे वडील शिवाजी राजगुरू यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
दरम्यान गौरव राजगुरुला मारहाण झालेल्या परिसराची पोलिसांनी बारकाईने तपासणी केली, मंचर एस टी स्टँड परिसरातील लक्ष्मी रोडवर असणाऱ्या एम जी मार्केट च्या जवळील न्यू हाय फॅशनच्या गल्लीत दोन इसम गौरवला मारहाण करत असल्याचे तेथील सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. त्या फुटेजच्या आधाराने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून मंचर येथील आरिफ अजीज कुरेशी आणि जुन्नर येथील संत्या उर्फ संतोष नारायण सकत (मूळ गाव, सांगवी, त्रिरत्ननगर, ता. जि. नांदेड) या दोघांना अटक केली.
सदर गुन्ह्याचा तपास जिल्हाअधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलुस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार नंदकुमार अढारी, तानाजी हगवणे, पोलीस कॉ. अजित पवार, दिनेश माताडे, अविनाश दळवी यांनी केला. आरोपींची ओळख पटवून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २५ ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी आरिफ कुरेशी आणि संतोष सकत यांनी जुन्या वादातून गौरव राजगुरूला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण करत गौरवाचा खून केला, त्यांनतर दोघेही आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी ४८ तासांत आरोपींना ताब्यात घेतल्याने जिल्हाभरातून मंचर पोलिसांचे कौतुक होत आहे.