मंचर प्रतिनिधी:
शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी काल जांबुत ता.शिरूर
येथील जोरी मळ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या १९ वर्षीय
पूजा नरवडे हिच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी थेट
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून अशा दुर्घटना रोखण्यासाठी तात्काळ
उपाययोजना करण्याची मागणी केली. यासह जुन्नर येथे होणारी बिबट सफारी लवकर पूर्ण
झाल्यास मानवी वस्तीवर बिबट्यांचा वावर कमी होऊन अशा घटना भविष्यात घडणार नसल्याचे
त्यांनी व माजी आमदार शरद सोनवणे यांनी वनमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपण वेगाने प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत
वनविभागाच्या मुख्य सचिवांना निर्देश देत असल्याचे सांगितले. तसेच कै.पूजा नरवडे
हिच्या वडिलांशी फोनवरून बोलून नरवडे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची
भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
वनविभागाचे उपवनसंरक्षक सातपुते, शिरूरचे वनपरिक्षेत्रअधिकारी म्हसेकर यांच्यासोबत यावेळी बैठक घेऊन व परिसराची पाहणी करून परिसरात तात्काळ पिंजरे लावण्यात येऊन बिबट्यांना निवरण केंद्रात स्थलांतरित करण्यात यावे यासाठी सूचना केल्या.