पारनेर प्रतिनिधी:
पारनेर - संगमनेर तालुक्याला जोडणारा व
दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या वासुंदे ते खडकवाडी या ७ किलोमीटरच्या
रस्त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार निलेश लंके
यांनी दिली आहे. शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ वासुंदे येथे होणार
असल्याची माहिती गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे व माजी सरपंच
महादू भालेकर व रविंद्र झावरे यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने खडकवाडी, मांडवे, पळशी, वासुंदे, माळवाडी, देसवडे, बोकनकवाडी, लाखेवाडी, शिक्री, कामटवाडी, टेकडवाडी व परिसरातील वाडी वस्तीवरील लोकांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वेळोवेळी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी भरीव असा ७ कोटी रुपये निधी रस्ता दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी प्रथमच एवढे मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. खडकवाडी वासुंदे परिसरातील १० ते १५ गावांसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी ऊस उत्पादक कांदा उत्पादक व शाळकरी मुलांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. तर हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली होती. परंतु आता या रस्त्याच्या मजबुतीकरण व रूंदीकरणासाठी मोठा निधी मिळाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था दूर होणार असल्याची माहिती अमोल उगले, रविंद्रशेठ झावरे, सुदामराव शिर्के, संचालक रावसाहेब बर्वे, डॉ.उदय बर्वे यांनी दिली आहे.