पुणे प्रतिनिधी:
पुण्यातील कोंढवा परिसरात अलीकडेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) मुख्य
कार्यालयावर एनआयए, एटीएसकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईनंतर आज पुन्हा
कोंढवा परिसरात तपास यंत्रणांमार्फत छापा टाकण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना
ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद, सोलापूरनंतर पुण्यातही राष्ट्रीय तपास यंत्रणेनं मोठी कारवाई केली
आहे.
देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ
इंडिया’ या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर २२
सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने ‘पीएफआय’ संघटनेच्या
कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये पीएफआय संघटनेचे माजी राज्य
सरचिटणीस रझी खान आणि अब्दुल कय्युम शेख या दोघांना अधिकार्यांनी ताब्यात घेतले
होतं. त्यावेळी दोघांकडून काही साहित्यही जप्त केले होते.
या कारवाईनंतर केंद्र सरकारच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेकडून पुणे
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी काही
आंदोलनकर्त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून कारवाई
सुरू आहे.
दरम्यान, आज पहाटे कोंढवा परिसरात तपास यंत्रणांनी छापेमारी केली आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी पीएफआय संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद कैफ अन्वर शेख, एसडीपीआयचे शहर अध्यक्ष अब्दुल अजीज बन्सल, उपाध्यक्ष दिलावर सय्यद, कलीम शेख यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतलं आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात पाचही जणांची कसून चौकशी सुरू आहे.