पुणे प्रतिनिधी:
मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन
आत्महत्या केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. माधुरी सुशांत वाघमारे (वय.२३) रा. मुंजाबा वस्ती, धानोरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. माधुरीला आत्महत्येस
प्रवृत्त केल्या प्रकरणी पती सुशांत वाघमारे याच्यासह नातेवाईकांच्या विरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माधुरीचे वडील आनंदा कांबळे (वय.४८) रा. निवृत्ती हाईट, एनडीए रस्ता, उत्तमनगर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधुरीचा
चार महिन्यांपूर्वी सुशांत याच्याशी विवाह झाला होता. सुशांत तिच्या चारित्र्याचा
संशय घेऊन छळ करत होता. त्याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो तिला मारहाणही
करायचा.
माधुरीची सासू तिला स्वयंपाकावरुन टोमणे मारत होती. छळामुळे माधुरी माहेरी आली. तिने निवृत्ती हाईट इमारतीच्या छतावरुन उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या माधुरीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पती तसेच त्याच्या नातेवाईकांच्या छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे माधुरीचे वडील आनंदा कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे तपास करत आहेत.