प्रतिनिधी:श्रीराम क्षीरसागर, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग
गणेश फेस्टिव्हल २०२२ निमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे २ ते ४ सप्टेंबर या दरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या बैलगाडा मालकांना ३ लाख ५३ हजार रुपये रोख,सहा मोटरसायकली, २१ जुंपते बैलगाडे व तीन सोन्याच्या अंगठ्या असे भरघोस बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.नावनोंदणी रविवार दि. २८ रोजी होणार आहे. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात गणेशोत्सवात गणेश फेस्टिवल २०२२ साजरा केला जातो.यानिमित्त मागील सतरा वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे दोन वर्ष शर्यतीत खंड पडला.त्यानंतर यावर्षी भव्य स्वरूपात शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरणार आहे.शुक्रवार दि.२ ते रविवार दि. ४ सप्टेंबर यादरम्यान शर्यतीचा थरार रंगणार आहे.विजेत्या बैलगाडा मालकांना प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस आहे. तीनही दिवस फळीफोडसाठी प्रत्येकी एक मोटरसायकल दिली जाणार आहे.द्वितीय क्रमांकासाठी १ लाख १ हजार रुपयाचे बक्षीस आहे. फळीफोड करणाऱ्या बैलगाड्यांना जुपते बैलगाडे, तृतीय क्रमांकासाठी ६१ हजार,चतुर्थ क्रमांकासाठी ४१ हजार रुपये तर फळीफोडसाठी जूपते बैलगाडे बक्षीस दिले जाणार आहे.प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत होणार आहे.फायनल शर्यतीत तीन दिवस विजेत्या होणाऱ्या बैलगाड्यांना तीन मोटरसायकली,तीन सोन्याच्या अंगठ्या व तीन जुंपते बैलगाडे बक्षीस दिले जाणार आहे. सतत तीन वर्ष प्रथम क्रमांकात विजयी होणाऱ्या बैलगाड्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतीची नावनोंदणी रविवार दि. २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्रीराम मंदिर वडगाव काशिंबेग येथे होणार आहे. बैलगाडा मालकांनी शर्यतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटाची व्यवस्था सुसज्ज अशी करण्यात आली आहे.