समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
गेल्या काही
दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप
शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत
आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची
मागणी केली आहे. तसेच गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील
शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वन
विभागाच्या वतीनं केले जात आहेत. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. पावसाळा सुरु झाल्यापासून गवे भात, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.
गव्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही शेतकन्यांनी जमीन पडीक ठेवली आहे. तर
काहींनी पडीक जमिनीत काजू, आंबा कलमांची
लागवड केली केली आहे. मात्र, गव्यांनी या
कलमांचीही नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या लोक वस्तीतील
भात शेतीतही गव्यांचे दर्शन होत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी
करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
जिल्ह्यातील खासगी जंगलाचा विचार करता या ठिकाणी गव्याचे आवडते खाद्य नष्ट होत आले आहे. त्यामुळे त्याच्या अन्नाचा प्रश्न पुढे आला आहे. खासगी जंगलात पाणवठ्यांची सोय नसल्याने हा प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात आता जंगलाबाहेर शेतीकडे हळूहळू भरवस्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. जंगलातून गवा भरवस्तीपर्यंत येऊ लागला आहे. मात्र, त्यांची वाढती संख्या शेती बागायती नव्हे, तर भविष्यात मानवासाठीही धोकादायक ठरु शकते.