समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एका तरुणाचा जीव गेलाय. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल गेला. समोरुन येत असलेल्या टँकरच्या मागच्या चाकाखाली हा तरुण चिरडला गेला. यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिवा आगासन रोडवर झालेल्या या अपघातमुळे एकच खळबळ उडाली होती. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातातली मृत तरुणाचं नाव गणेश पाले असं आहे. या अपघातानंतर पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यावर आरोप केला जातोय. युवकाच्या अपघाती मृत्यूला तेच जबाबदार असल्याची टीका केली जातेय. त्यामुळे या सगळ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खूर्चनही रस्त्यावरील खड्डे काही कमी होत नाहीत. उलट दरवर्षी खड्ड्यामुळे अनेकांना जीव गमावाला लागतोय. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन गांर्भीयाने केव्हा लक्ष घालणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.चाळण झालेल्या या रस्त्यावर मृत्यूचे खड्डे लोकांचे जीव घेत असल्याचं अधोरेखित झालंय. दरम्यान, या अपघाताची काळजाचा ठोका चुकावणारी दृश्यदेखील समोर आली आहेत.
सीसीटीव्ही
व्हिडीओमध्ये दोन बाईक, एक रिक्षा आणि एक व्यक्ती पायी चालताना दिसतोय. तर समोरच्या बाजूने एक टँकर
येताना दिसतोय. एका स्कूटीवर जात असलेला तरुण खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करततो. पण
एका खड्ड्यात तरुणाची स्कूटी आदळते आणि त्याचा स्कूटीवरील तोल जातो. यानंतर
रस्त्यावर कोसळलेल्या तरुणाच्या शरीरवरुन समोरचा टँकर धडधडत जातो. मागून येत
असलेल्या दुसऱ्या दुचाकी आणि रिक्षावाल्यासमोरच ही थरारक घटना घडते. या घटनेनंतर
या मार्गावर वाहतूक कोंडीही होते. पण तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिक प्रयत्न करतात.
दुर्दैवाने ते यशस्वी होत नाहीत. भलामोठा टँकर शरीरावरुन गेल्यानं तरुणाचा जागीच
जीव जातो.
याआधी ठाणे जिल्ह्यात ६ जणांचा खडड्यामुळे जीव गेलाय. आता ही संख्या सातवर पोहोचली आहे. खड्ड्यांमुळे ट्रकच्या किंवा अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली चिरडलं गेल्यांचा आकडा लक्षणीय आहे. अशाने मृत्यू होण्याचं प्रमाणही चिंताजनक असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. त्यामुळे अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन खड्ड्येप्रश्नी गंभीर आणि तातडीची पावलं उचलणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.