समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
अंबरनाथमध्ये दोन
भामट्यांनी एका वृद्ध महिलेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुढे मोफत
धान्यवाटप सुरू असल्याचा बहाणा करत या महिलेला चोरट्यांनी लुटल्याचा धक्कादायक
प्रकार अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात घडला. भामट्यांनी महिलेच्या अंगावरील ७ तोळे
दागिने आणि ३२ हजार रुपयांची रोख रक्कम या
भामट्यांनी चोरून नेली.
अंबरनाथच्या
बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या सुनिता ठाणगे या ६२ वर्षीय महिलेकडून ७ तोळ्यांचे
दागिने आणि ३२ हजारांची रोकड चोरट्यांनी लुटली आहे. सुनिता ठाणगे काल (गुरुवारी)
सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या. तिथून त्यांनी ३२ हजार रुपयांची रोकड
काढली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्या शिवाजी चौकातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी
गेल्या. भाजीपाला खरेदी करुन झाल्यानंतर त्या पुढे रिक्षा पकडण्यासाठी जात होत्या.
त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्यानं सुनिता यांना पुढे एक गुजराती
माणूस मोफत धान्यवाटप करत असल्याचं सांगितलं. मोफत धान्य घेण्यासाठी सुनिता त्या
व्यक्तीसोबत गेल्या. हा अज्ञात इसम त्यांना अंबरनाथमधील सागर ज्वेलर्स, सॅमसंग शॉपच्या बाजूच्या गल्लीत घेऊन गेला.
सुनिता यांच्या अंगावर तब्बल ७ तोळ्यांचे दागिने होते.
अंबरनाथमधील सागर ज्वेलर्स, सॅमसंग शॉपच्या बाजूच्या गल्लीत घेऊन गेल्यानंतर भामट्यानं त्याच्या जोडीदाराशी सुनिता यांची भेट घालून दिली. त्याच्या साथीदारानं गुजराती शेठला दागिने आवडत नसल्याचं सुनिता यांना सांगितलं. त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असंही त्यानं सुनिता यांना सांगितलं. दोन्ही भामट्यांच्या बतावण्यांना बळी पडून सुनिता यांनी आपले दागिने काढून पिशवीत ठेवले. त्यानंतर सुनिता यांच्या हातातली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. सुनिता यांना तात्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेत आहेत.