पुणे प्रतिनिधी:
जुन्या
भांडणाच्या कारणावरून एका महिलेला डोक्यात हत्याराचे वार करून खून केल्याची घटना
घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे हा प्रकार घडला. मृत
महिलेचा मृतदेह ऊस आणि बाजरी असणाऱ्या शेताच्या बांधावर आढळून आला. याप्रकरणी एका
व्यक्तीवर वालचंद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता
पांडुरंग वाघमारे (वय.४५ वर्ष) रा. वडजल, ता. माण, जि. सातारा असे
खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळू साठे रा. जांब, ता. इंदापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्टच्या
रात्री दहाच्या दरम्यान संगीता वाघमारे तसेच महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात
वाद झाला होता. यावेळी संगीता यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली होती. या
भांडणाच्या कारणावरून गायकवाड याचा नातेवाईक अक्षय साठे याने संगीता यांना जीवे
ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले. या हल्ल्यामध्ये
संगीता गंभीर जखमी झाल्या. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने अखेर संगीता
यांचा मृत्यू झाला. आरोपींनी अत्यंत निर्दयी पद्धतीने संगीता यांचा खून करून
त्यांचा मृतदेह तेथील शेताच्या बांधावर टाकून दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद आणि त्यानंतर खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.