समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
बारामती तालुक्यात नीरावागज गावात बुधवार (ता. २७) रोजी
रात्रीच्यावेळी मुसळधार पावसात वीज कोसळली. या घटनेत एक मजूर गंभीर जखमी झाला.
साहेबराव नारायण पवार (वय ६० वर्ष) रा.ऊरळी कांचन पुणे, हे जखमी मजूराचे
नाव आहे. पवार यांना वीजेचा मोठ्या धक्का भसल्याने त्यांच्या मानेपासूनचा
शरिराच्या डाव्या बाजूचा भाग भाजला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच माळेगाव
पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच जखमीला वैद्यकिय उपचार होण्यासाठी रुग्णवाहिकेद्वारे
बारामतीच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु संबंधित रुग्णाची स्थिती गंभीर
असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून हाॅस्पीलटला हलविण्यात आल्याचे
सांगण्यात आले. दरम्यान, नीरावागज येथे वीजेच्या धक्क्याने जखमी झालेले पवार हे
कुटुंबियांसह घिसाडी काम करण्यासाठी ऊरळी कांचन येथून आले होते.
सरकारची मदत मिळणार
नीरावागज येथे पावसात वीज पडून घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. जखमी साहेबराव पवार यांना ससून येथे उपचार सुरू आहेत. नैसर्गिक आपत्ती हेडखाली राज्य शासन संबंधित जखमीच्या कुटुंबियांना मदत करू शकते. ७ दिवस उपचार झाले तर ४ हजार तीनशे रुपये दिले जातील, ७ दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार झाले तर १२ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. याशिवाय काहीसे अपंगत्व आल्यास ५९ हजार शंभर रुपये, तर कायमचे अपंगत्व आले तर २ लाख रुपये संबंधितांच्या कुटुंबियांना दिले जातात. विशेषतः नैसर्गिक अपत्तीमध्ये मृत्यु झाल्यास मात्र ४ लाख रुपये संबंधितांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली जाते, अशी माहिती बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितली.