मंचर प्रतिनिधी:
पेठ, ता.आंबेगाव, जि.पुणे येथे गाय व
म्हशीचे मांस ओळखीच्या लोकांना विकणाऱ्या महिलेवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल एस.बी.रावते यांनी दिली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की,पेठ गावच्या हद्दीत श्रीराम मंदिराजवळ एक महीला जनावरांचे मांस विक्री करत असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस.बी.रावते यांना मिळाली.दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक महीला मंदिराजवळ बसलेली होती व तिच्याजवळ एक बॅग होती.पोलिसांनी तिला विचारले असता तिने तिचे नाव शफिया इसाक खुरेशी (वय.५० वर्ष) रा जुन्नर जि.पुणे असे सांगितले.सदर महिलेने तिच्या ओळखीच्या लोकांना गाय व म्हशीचे मांस विक्री करण्याचे पोलिसांसमोर कबुल केले.तसेच पोलिसांनी तिच्या जवळील ३ किलो मांस जप्त केले आहे.सदर महिलेवर महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहेत.