समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
गुरे चोरीच्या
गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी सिल्लोडकडे जात असताना चाळीसगाव ग्रामीण
पोलिसांचे वाहन पूलावरुन खाली कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. विशेष बाब
म्हणजे, अपघातानंतरही पोलीस थांबले नाहीत, 'ड्युटी फर्स्ट' असे म्हणत जखमी अवस्थेत पोलीस सिल्लोडला पोहचले
व गुरे चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. अपघात एवढा भीषण होता ती
यात वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते. मात्र, यातही सुदैवाने वाहनातील तीनही कर्मचारी बचावले. कर्मचाऱ्यांना
मुक्कामार लागला असून दुखापत झाली आहे.
चाळीसगाव
ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुरे चोरीच्या गुन्ह्यातील संशयित हे सिल्लोड
येथील असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांना
मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक नितीन आमोदकर, पोलीस नाईक गोवर्धन बोरसे, पोलीस नाईक संदीप पाटील या कर्मचाऱ्यांना रवाना
केले. कर्मचारी खाजगी वाहनाने सिल्लोड येथे जात असताना गाडी पूलावरुन कोसळून
वाहनाचा अपघात झाला. यात वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला. त्यात सुदैवाने ते वाचले
परंतु वाहनातील कर्मचाऱ्यांना मुक्कामार लागला तरी सुद्धा जखमी अवस्थेत तिघेही
कर्मचाऱ्यांनी सिल्लोड येथे जाऊन गुरे चोरी करणाऱ्या टोळीला जेरंबद केलं.
टोळीने
चाळीसगाव तालुक्यात चोरली तब्बल २० गुरे
शेख इम्रान शेख ईसा (वय.३० वर्ष), शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान (वय.२६ वर्ष) शेख उमेर शेख ताहीर (वय.२७ वर्ष) सर्फराज बिलाल खाटीक (वय.२२ वर्ष) शेख सत्तार शेख ईसा (वय.२४ वर्ष) शेख इरफान शेख ईसा (वय.३३ वर्ष) सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह,सिल्लोड, जि.औरंगाबाद या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांनी चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथून ६, वाघळी शिवार येथून ४, वडाळी आणि न्हावे येथून ३, जावळे येथून २ रोकडे फाटा येथून २ तसेच पिपंळवाड निकुंभ येथून ३ जनावरे अशी एकूण २० जनावरे सुमारे चोरी करुन नेल्याचं उघडकीस आलं आहे. संशयितांकडून ८ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडी वाहन देखील जप्त करण्यात आलेले आहे. गुरे चोरी केल्यानंतर सदर गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.