पुणे प्रतिनिधी:
मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत शेकडो झाडांची कत्तल
करण्यात आल्याप्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर गणपत जाधव (वय.६० वर्षे) रा. कर्वे रस्ता, पुणे यांनी याप्रकरणी
पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से गावाच्या हद्दीत
द्रुतगती मार्गाला खेटून असलेल्या जमिनीवरील मोठी झाडे कापून नेण्यात आली आहेत.
ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींमुळे हा प्रकार उघड झाला. तथापि, शासकीय यंत्रणेला
याबाबत काहीच माहिती नव्हती.
२५ ते २८ जुलैदरम्यान हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.