पुणे प्रतिनिधी:
पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी दि.२८ काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत चूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .बारामती तालुक्यातील २ गटांमध्ये याआधी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठीचे आरक्षण असतानासुद्धा हे २ गट खुले दाखविण्यात आले.परिणामी या २ गटात पुन्हा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे .या चुकीमुळे गुरुवारी काढण्यात आलेली आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागणार आहे .यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख फेरसोडतीला परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत .या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील गटांची नव्याने सोडत काढली तरीही सुमारे पाच-सहा गटांचा अपवाद वगळता अन्य गटांचे आरक्षण फेरसोडतीतही कायम राहील,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .शिवाय हे २ गट खुला संवर्ग किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) असणार आहे .परिणामी सध्या ओबीसी आणि खुल्या गटासाठी जाहीर झालेल्या गटांतील एक किंवा दोन गटांचे आरक्षण बदलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चक्राकार पद्धतीने आरक्षण जाहीर करणे बंधनकारक आहे .या पद्धतीनुसार याआधीच्या किमान चार निवडणूकिसाठीचे आरक्षण विचारात घेऊन त्या ठिकाणी एकाच प्रवर्गाच्या आरक्षणाची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.बारामती तालुक्यातील सांगावी-वडगाव निंबाळकर हा गट २००२ मध्ये खुला,२००७ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि २०१२ मध्ये अनुसूचित जाती (महिला) अनुक्रमे या सर्वांगासाठी आरकक्षित झाला होता. प्रत्यक्षात या तीनही निवडणुकीत हा गट खुला असल्याचे दाखविण्यात आल्याने ही चूक झाली आहे .
सहा दशकांत पहिल्यांदाच आरक्षण सोडत-
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून(१९६२) आजपर्यंतच्या सहा दशकांत एकदाही फेर आरक्षण सोडत काढण्याची वेळ पुणे जिल्ह्यावर आली नव्हती .राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कित्येक वेळा असे प्रकार घडले आहेत .परंतु पुणे जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची फेरसोडत काढावी लागणार आहे.