समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
आंतरजातीय विवाह केल्यावरून आजी रजिया शेख ही सातत्याने माझ्या पत्नीला नाहक त्रास देत होती. तिचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगत विनाकारण ती पत्नीची बदनामी करीत होती, या रागातून रजिया शेख यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची बाब उघड झाली आहे. शाहनवाज महेबूब शेख असे आजीचा खून करणाऱ्या त्या तरूणाचे नाव आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरात कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या रजिया शेख या शनिवारपासून दिनांक
२५ पासून बेपत्ता होत्या. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्यांचा खून झाल्याची
खात्री पोलिसांना झाली होती. ७२ वर्षीय महिलेचा खून कोणी का करेल, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी
तिच्या नात्यातील लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी दोन दिवसांपूर्वी शाहनवाज व
त्याची आजी रजिया यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी
तपास केला आणि त्याच्या ओळखीतील व्यक्तीमार्फत त्याला बोलावून घेतले. संशयित
म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आजीचा खून
केल्याची कबुली दिली. सध्या शाहनवाज हा पोलिस कोठडीत आहे. खुनाची घटना समोर
आल्यानंतर अवघ्या पाच तासांत शाहनवाजला पोलिसांनी पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, सदर बझार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर, पोलिस नाईक महेश शिंदे, तात्यासाहेब पाटील, राजु मुदगल, कुमार शेळके यांच्या पथकाने केली.
शाहनवाज शेख
याची आजी रजिया शेख या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटर (कमिशन एजंट) म्हणून
मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होत्या. त्या ज्याठिकाणी बसतात, तेथे खड्डा झाला होता. शनिवारी (ता. २५) काम
संपल्यानंतर आजी तेथील दर्ग्याजवळ येणार असल्याची त्याला माहिती होती. त्यामुळे तो
तेथेच थांबून होता. आजी आल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती, परिसरात शांतता होती. हा डाव साधून त्याने खड्डा
बुजवायला तेथील परिसरातून माती आणू म्हणून पडीक इमारतीत नेले. त्याठिकाणी त्याने
आजीच्या डोक्यात कौलारू घातले आणि पोटात स्क्रू-ड्रायव्हर भोकसून खून केला.