समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
कामावरुन काढून टाकल्याने दोघांनी दुकानात आग लावल्याची घटना उरळी
कांचन परिसरात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओंकार गायकवाड, अनिकेत मोटे दोघे रा. उरळी कांचन, सोलापूर रस्ता अशी गुन्हा दाखल करण्यात
आलेल्यांची नावे आहेत. याबाबत स्वप्नील भगवान कांचन (वय ३६ वर्षे) रा. उरळी कांचन यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कांचन यांच्या दुकानात आरोपी गायकवाड आणि मोटे कामाला होते. दोघांना काही
दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर कांचन यांच्या दुकानात
आग लागली. आगीत दुकानातील ५० लाखांच्या फर्निचरचे नुकसान झाले.
आरोपी गायकवाड, मोटे यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. दोघांनी दुकानात आग
लावल्याचा संशय कांचन यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानंतर या प्रकरणात
दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करत
आहेत.