मुंबई प्रतिनिधी :
भिवंडी येथील कामतघर भागात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २१ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी हसन शेख (वय.२१ वर्षे) याला अटक केली असून त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामतघर येथील हनुमाननगर भागात एकजण घरामध्ये गांजा साठवून ठेवत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली.
त्यावेळी पोलिसांना त्याच्या घरामध्ये २१.३१० किलो वजनाचा एकूण ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हसन याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.