समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
स्पर्धा परिक्षेत अपयश आल्याने एका तरुणाने
गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या
परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्याने मृत्यूपूर्वी
लिहलेल्या चिठ्ठीत केला आहे. महेंद्र देविदास पाटील ( वय .२२ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव
आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की,अमळनेर
तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र पाटील हा तरुण स्पर्धा परिक्षेचा
अभ्यास करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून जळगाव शहरातील आहुजा नगरात बहिण भारती
आणि मेव्हणे हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. रविवारी (२२ मे)
महेंद्रची बहिण आणि मेव्हणे आनोरे गावात लग्नाला गेले होते. बहिण भारती यांनी
मंगळवारी महेंद्रला फोन केला होता. मात्र, मोबाईल बिझी असल्याने संपर्क होवू शकला नव्हता. त्यामुळे भारती या काल
बुधवारी २५ मे रोजी सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होत्या. तरी देखील फोन लागत
नव्हता. त्यामुळे भारती यांनी जळगावातील त्यांचे शेजारी यांना संपर्क करुन खात्री
करण्यास सांगितले.
शेजारी घरी गेले असता, दरवाजा आतून लावलेला होता. दरवाजा ठोठावून
प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेजारच्यांनी तालुका पोलीस ठाण्यास फोन करुन पोलिसांना
याबाबत माहिती दिली. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे
पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मागील बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले.
त्यावेळी महेंद्र हा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरवाज्याचे लॉक
तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांनी
जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहून आक्रोश केला.
मृत्यूपूर्वी महेंद्रने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत
म्हटले आहे की, 'आई-वडील
देवासारखे आहे. जीवन गोल आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. माझा गोल वेगळा
आहे. पण, माझ्यासोबत अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.
एमपीएससीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे'. शेवटी महेंद्र
याने आई वडिलांचे आभार मानले आहेत. ही सुसाईड नोट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली
आहे.