पुणे प्रतिनिधी:
देशातील सर्वात मोठी
बैलगाडा शर्यतीला आजपासून पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात झाली आहे. बैलगाडा मालकांचा
अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने एक दिवस आधीच ही स्पर्धा सुरू करण्याची वेळ
आयोजकांवर आली आहे. तब्बल दीड कोटींची बक्षिसं असलेली ही स्पर्धा देशातील सर्वात
मोठी असल्याचा दावा आयोजक करत आहेत. चिखलीतील बैलगाडा घाट बैलगाडा मालक, शौकिनांनी फुलून गेला
आहे.
जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर आणि ११६
दुचाकी या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरत आहेत. स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या
बैलगाडा मालकांना ही बक्षीस दिली जाणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा
मालक पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेत, गुरुवारी टोकन घेण्यासाठी बैलगाडा
मालकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
या स्पर्धेसाठी
अवघ्या तीन तासांच्या कालावधीत तब्बल दोन हजार टोकन गाडा मालकांना देण्यात आली
आहेत. यामुळं उद्यापासून म्हणजे २८ मे पासून सुरू होणारी ही स्पर्धा आजपासूनच
घ्यावी लागली असून अनौपचारिक उदघाटन करण्यात आलं आहे.
आज सकाळी सहा वाजल्यापासून बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवण्यात आली असून पुढील चार दिवस भाजपचे दिगग्ज नेते या स्पर्धेला उपस्थिती लावणार आहेत.