नारायणगाव प्रतिनिधी:
पैशाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा
पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जमिनीतून धन काढून देतो, असे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. वारूळवाडी,ता.
जुन्नर येथील ही महिला असून तिची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आळे येथील भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे
यांनी दिली. या प्रकरणी निर्मला रमेश नारायणकर (वय.५१ वर्षे) या महिलेने दिलेल्या
फिर्यादीवरून भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार (वय.४२ वर्षे) रा. साईव्हिला
अपार्टमेंट, पाचवा मजला, रूम नंबर ५०२, आळे, ता. जुन्नर याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा
व जादूटोणा प्रतिबंध अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे तर घेतले मात्र ते परत करण्यात तो टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर निर्मला नारायणकर यांनी भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार याच्याविरुद्ध तक्रार करायचे ठरवले. कारण पैसे मागितले तर जीवे ठार मारण्याची व घराला आग लावून पेटवून देण्याची धमकी भोंदूबाबा इनामदार याने महिलेला दिली होती. शेवटी या भोंदूबाबाच्या दहशतीला कंटाळून नारायणकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पुढील तपास पोलिस करत आहेत.