जुन्नर प्रतिनिधी:
जुन्नर व आंबेगाव
तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्याला जी आय मानांकन मिळवून देण्यासाठी माजी
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील
असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. साधारणपणे सात जून नंतर या भागातील शिवनेरी हापूस हा विक्रीसाठी उपलब्ध होतो. मुंबई, पुणे यासारख्या बाजारपेठांमध्ये शिवनेरी हापूसला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी असते. शिवनेरी हापूसला जी आय मानांकन मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी हापूसवर संशोधन करून जी आय मानांकन प्रस्ताव मंजुरीसाठी म्हैसूर येथे पाठविण्यात आला आहे.
यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय
पानसरे व महानंदाचे कार्यकारी अधिकारी व आंबा उत्पादक अभिमन्यू काळे यांनी माजी
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी
अभिमन्यू काळे यांच्या बागेतील झाडांची फळे शरद पवार व अजित पवार यांना भेट देत
शिवनेरी हापूस आंब्याबाबत माहिती दिली. दरम्यान, आंब्याचे वितरण
करण्याकरिता बैठक घेणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.