समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
मे महिना तोंडावर आला असतानाही शहरातील नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून तीन आठवडय़ांत शहरातील नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा उरण नगर परिषदेच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर परिघात वसलेल्या उरण
शहरातील नालेसफाई करताना दुर्लक्ष केले जात असल्याने दरवर्षी शहरातील मध्यवर्ती
भागात पावसाचे पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. या वर्षी तरी ही समस्या निर्माण
होणार नाही याची दक्षता नगर परिषद प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरवर्षी शहरातील छोटे व मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी
नगर परिषद प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र त्यानंतरही शहरातील
अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांना
याचा पावसाळय़ात त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांतून पावसाच्या पाण्याचा निचरा
होत नसल्याने शहरातील अनेक रस्ते हे पाण्याखाली जातात. त्यामुळे नागरिकांचा इतर
भागांशी संपर्क तुटतो तर काही भागांत घरातही पाणी जात असल्याने घराचे व घरातील
सामानाचे प्रचंड नुकसान होते. असे असतानाही अद्याप शहरातील नालेसफाईची कामे सुरू
झालेली नाहीत. या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही प्रक्रिया पूर्ण होऊन शहरातील नालेसफाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.