समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
बीडमध्ये एका
सात वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेसीबीच्या साहायानं साफसफाई केली
जात होती. दरम्यान, धक्का लागून भिंक कोसळली आणि त्याखाली ही चिमुरडी
भिंतीखाली दबून गेल्यानं तिचा जीव गेलाय. यानंतर परिसरातील स्थानिक संतप्त झाले
होते. जेसीबी चालकाला यानंतर स्थानिकांनी चोप दिली आणि पोलिसांच्या हवालेदेखील
केलंय. रमजान ईद निमित्तानं यावेळी साफसफाई केली जात होती. त्यावेळी ही दुर्घटना
घडली. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेल्या या
सात वर्षीय चिमुकलीचं नाव सय्यद इकरा असं आहे. भिंती खाली दबून गुदमरल्यामुळे
सय्यद हीचा जागीच जीव गेला. या जेसीबीचा चालक नवीन होता अशीही माहिती समोर आली
आहे. ही घटना झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी जेसीबी चालकासह जेसीबीचीही
तोडफोड केली.
ही दु्र्दैवी
घटना माजलगावमध्ये घडली. माजलगावच्या इदगा मोहल्लामध्ये एक मोठी मशीद आहे. तिथं
साफसफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं. रमजान ईद असल्यानं नगरपालिकेकडून मशिदीच्या
परिसराची स्वच्छता करण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. त्यासाठी जेसीबीदेखील
मागवण्यात आला होता.
मात्र या
भागातील चिंचोळ्या गल्लीतून जेसीबी आत नेताना अडचणी येत होत्या. तरिही जबरदरस्ती
जेसीबी आतमध्ये घालण्यात आलेला. हा जेसीबी मशिदीसमोरील भिंतीजवळ आला असता, भिंतीला धक्का लागला आणि भिंत कोसळली. त्याचवेळी नेमकी सात वर्षांची सय्यद
ही तिथून जात होती. तेव्हा तिच्या अंगावर ही भिंत कोसळली आणि ती भिंतीखाली
दबल्यानं गुदमरली.
या घटनेनंतर
जेसीबीच्या मदतीनंच तिच्या अंगावरील भिंत बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण
तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सय्यद हीचा मृत्यू झाला होता. जखमी सय्यदला पाहून
तिच्या नातलगांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यानंतर नागरिकांनी
संतप्त होत जेसीबीवर दगडफेक केली. तसंच चालकाला मारहाणही केली. जेसीबीच्या काचा
फोडण्यात आल्या. नंतर याप्रकरणी स्थानिकांनी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात
ठिय्या घातला होता. याप्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह चार
जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.