समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
शिरगाव चिपळूण
तालुक्यातील अलोरे येथील चारजण कोलकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही बुडाले. यावेळी,
धनगर बांधवांनी दोघांना वाचवले, तर दोघे
अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये अलोरे सोमेश्वर मंदिर येथील सुजय संजय गावठे आणि
त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर ही बेपत्ता आहे. तर शाहीन कुट्टीनो,
रुद्र जंगम यांना वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी (२७
एप्रिल) सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. बेपत्ता सुजय गावठे आणि ऐश्वर्या
खांडेकरसोबत शाहीन कुट्टीनो, रुद्र जंगम हे सगळे महाविद्यालयीन मित्र- मैत्रिणी
कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले
होते. हे चौघेही पाण्यात पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू
लागले. तेव्हा त्यांनी आरडा-ओरड केली असता जवळच असलेल्या धनगर बांधवांनी धाव घेतली
रुद्र आणि शाहीन यांना बाहेर काढले. ते सुजयलाही बाहेर काढणार होते, मात्र ऐश्वर्या बुडत असल्याचे बघून तो पाण्यात परत गेला. त्यानंतर हे
दोघेही अद्याप बेपत्ता आहेत.