मंचर प्रतिनिधी :
बेकायदा ताडी विक्री करणाऱ्या टोळीला घोडेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आंबेगाव तालुक्यातील
शिनोली येथे रसायनमिश्रित ताडी अड्ड्यावर घोडेगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी
ताडी तयार करून विक्री करणाऱ्या तिघांसह सेवन करणारे दोघे अशा पाच जणांना
पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात शरिरास घातक
असे रसायन मिश्रित ताडी तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती घोडेगाव
पोलिसांना मिळाली होती. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खात्री केल्यानंतर याठिकाणी हा छापा पोलिसांनी टाकला आहे. यावेळी सहायक पोलीस
निरिक्षक जीवन माने यांच्या टिमने सापळा रचून ११ हजारांच्या मुद्देमालासह पाच
जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. यात अजून कोण कोण सहभागी आहे, याचाही तपास घोडेगाव पोलिसांमार्फत करण्यात येत आहेत.