समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
जुन्या दिवाणी दाव्यात वकील म्हणून काम करण्यास नकार दिल्याचा
राग मनात धरून चाळीसगाव न्यायालयात वकील संघाच्या दालनासमोरील व्हरांड्यातच करजगाव
(ता. चाळीसगाव) येथील एकाने वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत
जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच इतर वकील तत्काळ धावल्याने मोठा
अनर्थ टळला.
दरम्यान, हा प्रकार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी शहर
पोलिसांत त्याच्याविरोधात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत येथील अॅड.
सतीश खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की करजगाव येथील किसन मोतीराम सांगळे
यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या दिवाणी वादाबाबत २०१० ते २०१३ दरम्यान चाळीसगाव
न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्यातर्फे अॅड. खैरनार काम पाहात होते.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,खटल्यात सांगळे यांच्या बाजूने
मनाई हुकूम पारीत करून दिला होता. त्यानंतर सांगळे यांच्या दुसऱ्या जमिनीबाबत
असलेल्या दिवाणी दाव्यात ते सहकार्य करीत नसल्याने अॅड. खैरनार यांनी दुसरा वकील
नेमावा, असे किसन सांगळे
यांना सांगितले होते. दोन्ही दाव्यांचा निकाल सांगळे यांच्या बाजूने लागला होता.
त्यानंतर जळगाव दिवाणी न्यायालयातील दाव्याचा निकाल मात्र सांगळे यांच्याविरोधात
लागला. हे दावे अॅड. खैरनार यांनी लढवलेले नसताना सांगळे यांनी खैरनार व इतर तीन
वकिलांविरोधात बार असोसिएशनकडे तक्रार केली होती. अशातच अॅड. एस. टी. खैरनार
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वकील संघाबाहेरील ओट्यावर मुलगा अॅड. उदय
खैरनार यांच्याशी कोर्ट कामकाजाबाबत चर्चा करीत होते.
त्याचवेळी संशयित किसन सांगळे अॅड. खैरनार यांच्याजवळ आला व
त्यांनी पिशवीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि ती अॅड. सतीश खैरनार यांच्या
तोंडावर फेकत अंगावर ओतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने अॅड. खैरनार घाबरले. किसन
सांगळेने आगपेटी पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना, इतर वकिलांनी
सांगळेच्या हाताला झटका दिला. ज्यामुळे आगपेटी व काडी खाली पडली व अनर्थ टळला.
सांगळे यांनी अॅड. खैरनार यांना ठार मारण्याचीही धमकी दिली. या फिर्यादीवरून संशयित
किसन सांगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराचा वकील
संघाने निषेध केला.