समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
यवतमाळमध्ये कुलरचा
शॉक लागून एका १२ वर्षांच्या चिमुरड्यानं जीव गमावला आहे. विदर्भात पारा कमालीचा
वाढलेला आहे. लोकांना घामाच्या धारा लागल्यात. अशाच दिलासा मिळावा, म्हणून लोकांकडून कुलरचा वापर होणं स्वाभाविक आहे. मात्र कुलर वापरताना
काळजी न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असं
वारंवार पाहायला मिळतंय. यवतमाळमध्ये घडलेल्या घटनेनं हीच बाब पुन्हा एकदा
अधोरेखित केली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं आई-वडिलांना मोठा धक्का
बसला आहे. तर संपूर्ण गावावरही शोककळा पसरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव
तालुक्यात ही घटना घडली. बाबुळगाव तालुक्यामधील सावर या गावामध्ये राहणाऱ्या ढवळे
कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे
हळहळ व्यक्त केली जाते आहे.
सावर गावातील
ढवळे दाम्पत्याला एकुलता एक मुलगा होता. संकल्प अमोल ढवले हा १२ वर्षांचा मुलगा
चौथीत शिकत होता. घरी कुलर साफ करण्याच्या उद्देशानं संकल्प कामाला लागला. पण चालू
कुलर साफ करणं त्याच्या जीवावर बेतलं. चालू कुलरच्या पाण्याची साफसफाई करताना
संकल्पला करंट लागला. त्यात संकल्पचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.
संकल्पला शॉक
लागल्यानंतर लगेचच शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत
घोषित केलंय. एकुलता एक मुलगा गमावल्यानं संकल्पच्या आई-वडिलांवर शोककळा पसरली
आहे. तर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.