पुणे प्रतिनिधी:
चाकण ते वासुली फाटा (ता.खेड) या नूतनीकरण झालेल्या रस्त्यावर
अपघातांची मालिका सुरूच आहे. आंबेठाण येथील अंगारमळा परिसरात झालेल्या अपघातात
शिंदेगाव येथील एका माजी सरपंचांचा मृत्यू झाला आहे.हा रस्ता रुंद आणि गुळगुळीत
झाल्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील आठ ते दहा महिन्यांच्या काळात या
मार्गावर झालेल्या अपघातात जवळपास बारा ते तेरा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला
आहे.त्यामुळे या मार्गावर गतिरोधक उभारण्याची जोरदार मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती
अशी की, चाकण ते करंजविहिरे हा जवळपास १९ किमी
लांबीचा रस्ता आहे. हायब्रीट योजनेत या मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात आले
आहे. रस्त्याचे काम चांगले झाले आहे. रस्ते नवीन झाल्याने वाहनांचा वेग वाढला असून
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मात्र गतिरोधक नाहीत.या एकूण मार्गापैकी चाकण ते
वासुली फाटा हा बारा किमी लांबीचा रस्ता मात्र नागरिकांना जीवघेणा ठरत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा औद्योगिक वसाहत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्याने
वर्दळ मोठी आहे. गुळगुळीत रस्ते झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड आहे.परंतु या
मार्गावर गतिरोधक नसल्याने सतत अपघात घडत आहे..
काल आंबेठाण येथे झालेल्या अपघातात शिंदेगाव येथील माजी सरपंच शांताराम पानमंद यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी येथील राजमुद्रा हॉटेल परिसरात झालेल्या अपघातात दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.या अलीकडच्या घटना आहेत. नोंद नसलेल्या अपघातांची संख्या तर मोठी आहे. याशिवाय भांबोली परिसर,जुना शेलू फाटा,वराळे हद्दीत देखील अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. नित्याने अपघात होणारी ठिकाणे लक्षात घेता त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी वराळे आणि भांबोली ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गतिरोधक उभारले होते परंतु काही कारणास्तव पुन्हा ते काढून टाकावे लागले.