समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
नांदेड रेल्वे स्टेशनवर आज सकाळी धक्कादायक
घटना घडली. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या
खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास
ही घटना उघडकीस आली. तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक
तीनवर उभी होती. गाडीच्या एका बोगीच्या खिडकीला लटकून सदर तरुणाने आत्महत्या
केल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले. त्यानंतर याविषयीची माहिती तत्काळ रेल्वे
स्टेशन पोलीसांना देण्यात आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय २५ वर्षांच्या
आसपास असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग
पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह
विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी
सांगितले आहे.
बुधवारी सकाळी तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी
प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर यार्डमध्ये उभी होती. या गाडीच्या एक डब्यातील
शौचालयाच्या बाहेरच्या बाजूने खिडकीला मोठ्या रुमालाने अनोळखी युवकाने आत्महत्या
केल्याचे दिसून आले. ही माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना रेल्वे
प्रशासनाने कळवली. त्यानंतर उनवणे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
विजया मेलफेदेवार या घटनास्थळी दाखल झाल्या. सदर मृतदेह रेल्वेच्या खिडकीवरून खाली
उतरवून पंचनामा करून तपासणी करण्यात आली. सदर इसमाच्या खिशात ओळख पटवणारे काहीही
पुरावे सापडले नाहीत. मात्र तो 25 वर्षे वयाचा असावा, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे
आवाहन
दरम्यान, पोलिसांनी सदर इसमाची ओळख पटल्यास
त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मयताचा चेहरा गोल, रंग सावळा, उंची साडेपाच फूट, सडपातळ बांधा, अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट असा पेहराव
आहे. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे
पोलिसांनी सांगितले आहे.