समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
मालवण तालुक्यातील एका गावात
बैलांच्या झुंजीत एका बैलाचा हकनाक बळी गेला आहे. मालवण तळगाव येथील एका मैदानात
कुडाळ येथील दोन बैलाची झुंज आयोजित करण्यात आली होती. ही झुंज तब्बल एक तास सुरू होती. या झुंजीत
वेंगुर्लेतील बैल झुंजीच्या दरम्यान जखमी झाला होता, त्या बैलाचा अखेर मृत्यू झाला
आहे. बैलांच्या झुंजीला सुप्रीम कोर्टाची बंदी आहे. असे असताना हजारो लोकांच्या
उपस्थितीत येथील खासदार विनायक राऊत यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैलांच्या
झुंजीला परवानगी दिली कोणी, असा प्रश्न
उपस्थित होत आहे. दरम्यान, सध्या सोशल
मीडियावर या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल होत असून या मुक्या जनावराचे विव्हळणे मन
हेलावून टाकणारे आहे.
राजकीय पदाधिकाऱ्याशी संबंधित
कार्यक्रम
झुंजीत
विजयी झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा होता म्हणून
पोलीस गप्प होते का, असा प्रश्न
सर्व सामान्य नागरिकांना आता पडला आहे. याप्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे.
तसेच अशाप्रकारच्या झुंजी होऊ नयेत, असाही सूर उमटत आहे.
प्राणीप्रेमी संतप्त
आता या
बैलाच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमी असलेल्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. स्वार्थी
माणसांनो, स्वत:च्या
स्वार्थासाठी, हौशीसाठी
निष्पाप जीवांचा बळी देऊ नका. तुम्ही स्वत: झुंजीला उभे राहाल का? स्वत:ला मृत्यूच्या दारात लोटाल
का? त्यांना
बोलता येत नाही याचा फायदा उठवता का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.