जुन्नर प्रतिनिधी:
जुन्नर नगर पालिकेच्या
प्रारूप रचनेचा आराखडा दोन मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे
सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले
आहेत.या आराखड्यास ७ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी मान्यता देणार असून, १० मार्चपर्यंत नागरिकांच्या
माहितीसाठी प्रभाग रचना व मार्गदर्शक नकाशे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रभाग
रचनेवर नागरिकांना १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना घेता येतील. हरकती व सूचनांवर २२
मार्चपर्यंत सुनावणी होईल. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने २५ मार्चपर्यंत पालिका
प्रशासनाला अहवाल मिळणार असून, एक एप्रिलला राज्य निवडणूक आयोगाची प्रभाग रचनेस अंतिम
मान्यता मिळणार आहे. अंतिम अधिसूचना ५ एप्रिलपर्यंत प्रकाशित करण्यात येणार आहे.
जुन्नर नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत ९ जानेवारीला संपली आहे. त्यामुळे
इच्छुकांचे डोळे नगर पालिकेच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे लागले आहेत.
सदस्य संख्येत तीनने वाढ
नवीन प्रभाग रचनेत पालिकेच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे. राज्य सरकारच्या २ नोव्हेंबर २०२१ च्या अध्यादेशानुसार ‘क’ वर्गासाठी सदस्य संख्येत तीनने वाढ करण्यात आली आहे. तसेच, किमान संख्या २० व २५ पेक्षा अधिक नसावी, असे नमूद केले आहे. जुन्नरची २०११ ची लोकसंख्या २५ हजार ३१५ इतकी आहे. ही लोकसंख्या गृहीत धरून कच्ची प्रभाग रचना केली असल्याचे समजते. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे दहा प्रभागात २० सदस्य आगामी रचनेत असतील. प्रत्येक प्रभाग सुमारे २ हजार ५०० लोकसंख्येचा असेल. यात सुमारे २२ हजार मतदार अपेक्षित आहेत. जुन्नर नगर पालिकेची सदस्य संख्या तीनने वाढली असली; तरी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेत वाढ होणार नसल्याचे सांगण्यात आले.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ५ व खुल्या वर्गासाठी दहा जागा राहतील. यात महिलांसाठी दहा जागा राखीव असतील.