घोडेगाव :प्रतिनिधी
शिनोली ता. आंबेगाव येथील शंकर बाबूराव बोऱ्हाडे यांनी यांच्यासह इतरांच्या सामायिक मालकीच्या क्षेत्रातील सागाची झाडे कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या तोडून विक्री केली आहे! या क्षेत्रात शेकडो सागाची आणि इतर झाडे असून सदर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची देखील मोठी हानी झाली आहे.
याबाबत सौ उज्वला बारवे बोऱ्हाडे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन आणि घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात कायदेशीर तक्रार दिली आहे. घोडेगाव पोलिसांनी याबाबत माहिती घेऊन शंकर बाबुराव बोऱ्हाडे भा.द.वि. कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला असून वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र झाडे तोडणे नियमन १९६४ अंतर्गत कलम तीन तरतुदींचा भंग करून झाडे तोडल्यास वृक्ष अधिकारी चौकशी करून गुन्हा दाखल करू शकतात. स्वतंत्र वन गुन्ह्यांत दोन हजारांवरून पाच हजार रुपये शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच, अवैध वाहतूक केल्यास १९२७ चे कलम ४२ नुसार एक वर्ष कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद आहे याबाबत आधी सूचीमधील झाडांची अवैध वृक्षतोड व वाहतूक करण्यासंदर्भात वनविभागाने अतिशय कठोर नियम केलेले आहेत शिक्षेत दुप्पट वाढ करून पाच हजार रुपये पर्यंत दंड व तसेच एक वर्षाची कैद अशा तरतुदी केल्या आहेत. शिनोली येथील अवैध वृक्षतोडी संदर्भात अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून दोषींवर जरब बसवणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास आम्ही या प्रकरणात रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
संदीप मेमाणे, वृक्षमित्र संघटना, महाराष्ट्र राज्य.
कुठलाही बेकायदा वृक्षतोड करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शंकर बाबुराव बोऱ्हाडे यांनी कुठलीही परवानगी न घेता सदर वृक्षतोड केली असल्याची तक्रार प्राप्त झाली असून; आम्ही वनपालांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कुठलाही पक्षपात न करता कारवाई करण्यात येईल.
महेश गरगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव.