औरंगाबाद प्रतिनिधी:
वैजापूर शिवसेनेचे आमदार रमेश
बोरनारे यांनी भावजयीला मारहाण केल्याप्रकरणी येत्या सात दिवसात चौकशीचा अहवाल
सादर करा, असे आदेश
देण्यात आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी
पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना हे आदेश दिले आहेत. कायदा सर्वांसाठी समान असतो, त्यामुळे या प्रकरणात दोषींवर
निश्चित कारवाई केली जाईल, असं
अश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे. राजकीय दबावापोटी वैजापूरचे पोलीस ठोस भूमिका घेत नाहीयेत, असा संशय व्यक्त करण्यात आला
होता. भाजपच्या चित्रा वाघ यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर
पोलीस महासंचालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
वैजापूर पोलिसांच्या भूमिकेवर
संशय
18 फेब्रुवारी
रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत वैजापूर
तालुक्यातील सटाणा येथील कार्यक्रमात आमदार बोरनारे यांच्या भावजय जयश्री बोरनारे
उपस्थित होत्या. तुम्ही भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या, असा सवाल करत आमदार रमेश बोरनारे
यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात
केली होती. त्यावरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आमदार
बोरनारे यांनी खासगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादिवरच अॅट्रॉसिटीचा
गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले, असाही आरोप केला जात आहे. भाजपने वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची
दखल घेतली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी पोलिसांनी भेट घेतली असता
राजकीय दबावापोटी पोलीस सौम्य कारवाई करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला
होता. या प्रकरणी पीडितेविरुद्धचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेऊन आमदार बोरनारे
यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
सात दिवसात चौकशी अहवाल सादर
करण्याचे आदेश
आमदार
बोरनारे प्रकरणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विशेष पोलीस
महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. तसेच
भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करीत पीडितेविरुद्धचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे
घ्यावा व आमदार बोरनारे यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा दाखल
करावा, अशी मागणी
केली. या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकांनी सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे
आदेश पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना दिले आहेत.