प्रतिनिधी:पुणे
राज्यातील दहावी आणि बारावीच्या
परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री, राज्य मंडळ
आणि शिक्षण राज्यमंत्री परस्पर विरोधी भूमिका मांडत असल्याने शिक्षण विभागात विसंवाद
आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे.
राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार
दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३०
मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने
दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही राज्य मंडळाने परीक्षा
ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची तयारी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड
यांनीही परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्याची भूमिका मांडली आहे. मात्र शिक्षण
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांना दहावी-बारावीच्या
परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. त्यामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षकांमध्ये
संभ्रम निर्माण होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्य मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देऊन
परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याची मागणी केली आहे. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम
ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अध्यापन करून पूर्ण
करण्यात आला आहे. चाचणी परीक्षा, सत्र
परीक्षाही झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लेखन कमी झाल्याने विद्यार्थ्यांना
परीक्षेत वेळ वाढवून देण्याची घोषणाही आधीच करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची
तयारी आणि उजळणीसाठी महिन्यभराचा कालावधी आहे. अचानक मूल्यमापन पद्धतीत बदल करणे
चुकीचे आहे, परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्यास
राज्याच्या काही भागातील कडक उन्हाळा, काही
भागातील अवकाळी पावसाची शक्यता विचारात घेतली पाहिजे.त्यामुळे परीक्षा
वेळापत्रकानुसारच घ्याव्यात, असे नमूद
करण्यात आले आहे.